आमदार प्रतिभा धानोरकर यांची विधानसभेत मागणी

चंद्रपूर : शहरातील गोल बाजारातील गाळेधारकांची भाडेवाढ २०० पटीने वाढविलेली असुन हि भाडेवाढ अन्यायकारक असून ती मागे घ्यावी तसेच मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात महानगर पालिका चंद्रपूर येथे झालेल्या भष्ट्राचाराची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेदरम्यान केली. 

महानगरपालिकेत मागील ५ वर्षांमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झालेत. या सर्व घोटाळ्यांबद्दल वारंवार आरोप झालेत. सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी आणि महापालिकेतील अधिकारी हे संगनमत करून भ्रष्टाचार केले. कोविड-१९ आपत्तीमुळे महानगर पालिकेची आर्थिक स्थिती गंभीर झालेली असताना देखील, अनेक ठिकाणी अनावश्यक खर्च करण्यात आला. अनेक निविदा प्रक्रिया या कंत्राटदारांच्या लाभासाठी राबविण्यात आल्या. या घोटाळ्यांमुळे मनपाला मोठा आर्थिक फटका बसला. सामान्य जनतेच्या पैशाचा दुरुपयोग झाला. त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. 

चंद्रपूर महानगरपालिकेच्या  ५०० गाळेधारकांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ५०० गाळे मनपाच्या हद्दीत आहेत. मनपा आणि राज्य सरकारच्या करारानुसार गाळेधारकाच्या कर महसूल दरवर्षी वाढवायचा असतो. मात्र, मनपाने कोणताही टॅक्स न वाढविता तीन वर्षाचा कर महसूलाची नोटीस एकाच वेळी दिली. त्यामुळे गाळेधारकांवर एकाचवेळी आर्थिक बोझा आला. त्यावर १५१ लोक न्यायालयात गेले. तेव्हा ते टॅक्स भरायला तयार झाले. मात्र, तत्कालीन आयुक्तांनी तो टॅक्स स्वीकारला नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी त्यानी केली.