चंद्रपूर : महानगरपालिका प्रशासनाने शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा येथे प्रवेशासाठी शूल्क घेणे सुरू केले. या निर्णयाचा निषेध नोंदवित जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुधवारी (४ जानेवारी) ला दुपारी ४ वाजता भीक मागो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर भीकेतून प्राप्त ३ हजार १६७ रुपयांची रक्कम आयुक्त, उपायुक्त यांनी स्वीकारली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीत ही रकम जमा केली जाणार आहे.    

महात्मा गांधी चौकातून भीक मागो आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरील दुकानदार, छोटे व्यापारी यांच्याकडून भीक मागण्यात आली. आझाद बगीचा परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत प्रवेश शूल्क रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर भीकेतून जमा झालेली ३ हजार १६७ रुपयांची रकम काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून मनपा आयुक्त, उपायुक्त देण्याकरीता तयारी करण्यात आली,परंतु त्यानी रक्कम स्वीकारली नाही. केवळ शूल्क रद्द करण्याचे निवेदन स्वीकारले.

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी ६ एकरात मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा आहे. या बगीचाची मालकी महापालिका प्रशासनाकडे आहे. मागील काही वर्षांपूर्वी या बगीचाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे बगीचाचे सौंदर्यीकरण, नूतनीकरण करण्यात आले. त्यावर सुमारे ७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. चंद्रपूरकर जनतेसाठी हा एकमेव बगीचा असल्याने दररोज सकाळ, संध्याकाळ येथे अबालवृद्ध मोठ्या संख्येने येत असतात. सोबतच ग्रामीण भागातून जिल्हास्थानी आलेले नागरिकही बगीचा बघण्यासाठी मोठी गर्दी करीत आहेत.

परंतु, मनपा प्रशासनाकडून या बगीचाच्या देखभाल दुरुस्तीसाठी तरुण, वृद्धांकडून दहा रुपये, १२ वर्षांवरील मुलांकडून ५ रुपये प्रवेश शूल्क घेणे सुरू केले आहे. हा प्रकार जनतेची लूट करणारा आहे. चंद्रपूरकरांकडून वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून कोट्यवधी वसूल करणाऱ्या मनपा प्रशासनाला सर्वाधिक प्रदूषित शहरातील नागरिकांना बगीचाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पैसा नसल्याने चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर  तसेच  पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चंद्रपूरकरांसाठी विरंगुळा म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा हा एकमेव आहे. परंतु, महापालिका प्रशासनाकडून बगीचा प्रवेशासाठी शूल्क घेतले जात आहे. हा निर्णय चंद्रपूरकरांच्या खिशात हात घालणारा आहे. त्यामुळे शूल्क घेण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, यासाठी भीक मागो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून प्राप्त भीकेची रकम आयुक्त, उपायुक्त यांनी घेण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे.

: रितेश (रामू) तिवारी, जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर