▪️ खासदार धानोरकरांचा सामूहिक कृतीदल स्थापन्याचा सल्ला

▪️ तिसरा बळी गेला तर जनता सळो की पळो करून सोडेल : माजी वन मंत्री मुनगंटीवार

▪️ तर आमदार जोरगेवार म्हणतात हिंसक प्राण्यांना हद्दपार करा

चंद्रपूर : बुधवार आणि गुरुवारी चंद्रपूर लगतच्या दुर्गापूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर चंद्रपूरातील लोकप्रतिनिधी ॲक्शन मोडवर आले आहेत. माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, वनविभाग यांची आढावा बैठक घेऊन वाघांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत खासदार बाळू धानोरकर यांनी सामूहिक कृतीदेव स्थापन्याचा सल्ला दिला तर माजी वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना थेट निर्वाणीचा इशारा देत तिसरा बळी गेला तर जनता सळो कि पळो करून सोडेल असा दमच भरला. आमदार किशोर जोरगेवार यांनी, थेट हिंसा प्राण्यांना हद्दपार करण्याचा सल्ला दिला आहे. माजी वनमंत्री तथा आमदार, खासदार व आमदारांनी केलेल्या सूचनांचे पालन होवून वाघ, बिबट्यांचा बंदोबस्ताकरीता जिल्हा प्रशासन, वन विभाग व महाऔष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी ॲक्शन मोडमध्ये येतात का ? याकडे दुर्गापूर ऊर्जानगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बुधवार व गुरूजी सि.एस.टी.पी.एस. आणि दुर्गापूर परिसरातील दोघांचा नाहक बळी गेल्यानंतर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या हद्दीत सुरु असलेला वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सिटीपीएस, वेकोलि आणि वनविभागाने संयुक्त कृतीदल स्थापन करून हा संघर्ष टाळण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रामगावकर, महाप्रबंधक महाऔष्णिक विद्युत केंद्र पंकज सपाटे, डीएफओ खाडे, निवासी जिल्हाधिकारी मेश्राम, महाक्षेत्रीय प्रबंधक वेकोलि कावळे, महाक्षेत्रीय प्रबंधक वेकोलि शाबीर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, गोपाल अमृतकर यांची उपस्थिती होती.

शहराला लागून असलेल्या महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोली, दुर्गापूर परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढदे आहेत. त्यामुळे या परिसरात वाघ, बिबट व अस्वल या वन्य स्वपदांचा वावर आढळून येत आहे, तो सहज दिसून येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झुडपांची साफसफाई करण्याची जबाबदारी हि वेकोलि व सि.एस.टी.पी.एस. यांची असून हि जबाबदारी त्यांनी तात्काळ पार पाडावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. विनाकारण जंगलपरिसरात प्रवेश न करणारे फलक रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात यावे. सि.एस.टी.पी.एस. ने ९०० मीटर सुरक्षा भिंतीचे काम तात्काळ करावे. सि.एस.टी.पी.एस. आणि दुर्गापूर परिसरातील वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून संयुक्त कृतीदल स्थापन करावा. या परिसरातील ७ वाघ इतरत्र हलविण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. औद्योगिक व मानवी वसाहतीत फिरणाऱ्या वन्य स्वापदांना पकडण्याचे अधिकार क्षेत्र संचालकांना द्यावे. वेकोलि क्षेत्रात आतील भागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उंच्च मचानी उभारण्याच्या मौलिक सूचना यावेळी करण्यात आल्या.

वन्यजिव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी हिंसक प्राण्यांना हद्दपार करा - आ. किशोर जोरगेवार

महाऔष्णिक केंद्राच्या हद्दीत सुरु असलेला वन्यजिव व मानवी संर्घष टाळण्याबाबत उपाय योजना करण्यापेक्षा महाऔष्णिक विज केंद्राला नको त्या कामांवर पैसा खर्च करणे महत्वाची वाटत आहे, अशा शब्दात संताप व्यक्त करीत वन विभागाने हिंसक जंगली प्राण्यांना तात्काळ येथून हद्दपार करावे तर महाऔष्णिक विज केंद्रातील महाऔष्णिकेंद्रातील कामगारासाठी सुरक्षा साधने देत वन्यजिव हल्यांपासून बचाव करण्याचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाऔष्णिक विज केंद्र व वनविभागाला केल्या आहे.

आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाऔष्णिक वीज व वनविभाग अधिकाऱ्याची बैठक घेत वाघाची दहशत असलेल्या परिसराची पाहणी केली. यावेळी हिंसक जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करा या मागणी करिता उपोषणावर बसलेले राष्ट्रवादी कॉग्रेस युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपोषण पेंडाललाही भेट देत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.
महाऔष्णिक वीज केंद्राच्या वतीने जंगलालगत कटघर बांधण्यात येणे आवश्यक होते. या सर्व आवश्यक कामांकडे लक्ष देण्यापेक्षा सिएसटीपीएसला नको त्या कामांवर पैसा खर्च करणे आवश्यक वाटत आहे. मात्र आता हा प्रकार चालनार नाही. नागरिकांच्या सुरक्षेची समजवता खपवून घेतला जाणार नाही असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सिएसटीपीएसचे जवळपास ७ हजार कामगार वाघांच्या दहशतीत काम करत आहे. त्यामूळे या कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी सिएसटीपीएने स्विकारली पाहिजे अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. सोबतच या भागात गस्त घालणा-या वन विभागाच्या पथकांमध्ये वाढ करण्यात यावी, येथील कामगारांना वन्य जिवांच्या हल्ल्यातून बचाव करणारे व्हाईस गण, लेजर लाईट गण व इतर आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करुन देण्यात यावे, वनविभागाकडून कामगारांना प्रशिक्षीत करण्यात यावे, या भागात वावर असलेल्या हिसंक प्राण्यांचे स्थलांतरण करण्यात यावे, रात्री लाईटची सोय उपलब्ध करावी, रस्त्या लगतचे झाडे झुडपी साफ करण्यात यावी यासह अनेक सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर बैठकीत केल्या आहेत.


...तिसरा बळी गेला, तर जनता तुम्हाला सळो की पळो करून सोडेल : मुनगंटीवार

वाघाच्या हल्यात दोघांचा बळी गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत माजी वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार हे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले.
नेता बनू नका, कामाचे नेता बना आणि उभे राहून काम करून घ्या. नाहीतर ही बैठक संपल्यानंतर दुसऱ्या एखाद्या बैठकीत गेल्यावर झुडुपं काढण्याचे काम तुम्ही विसरून जाल, असे म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दटावले. वातानुकूलित कार्यालयात बसून कुणी आम्हाला व्याघ्रप्रेम शिकवू नये, आम्ही जंगलात राहून प्रेम केले आहे. तेव्हा कुठे वाघांची संख्या वाढून २८३ झाली. पण आता तुमच्या चुकीने जर का वाघाच्या हल्ल्यात तिसरा बळी गेला, तर जनता तुम्हाला सळो की पळो करून सोडेल, हे विसरू नका. असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावले.

बैठकीनंतर आमदार मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपुरात वाघाचा थरार जनता अनुभवत आहे. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी, थर्मल पॉवर स्टेशनचे चीफ जनरल मॅनेजर व जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्या विभागातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक आत्ता आम्ही घेतली. या बैठकीत आम्ही काही निर्णय घेतले. वनविभागाच्या सचिवांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. चंद्रपूर शहरालगतच्या परिसरात १० वाघ आहेत. या १० वाघांचे रीलोकेशन करण्याची परवानगी तात्काळ देण्यात यावी. यामध्ये जी मदत केली जाते ती मी वनमंत्री असताना ही मदत १५ लक्ष रुपये रुपयांपर्यंत वाढविली होती. आता ती २० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

या परिसरात झुडपं वाढले आहेत, या झुडपांचा आधार घेऊन वाघ मानवावर हल्ले करतात, ही झुडपे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यप्रदेशच्या धर्तीवर अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याची गरज आहे. या यंत्रणेमध्ये कोणताही वन्यप्राणी जंगलातून मानवाच्या वस्तीकडे यायला निघाला की, अलार्म वाजतो. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्षाच्या घटना गेल्या एक दीड वर्षात वाढल्या आहेत. भारतातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. ज्या लोकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धन केले त्यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली जात नाही. पण आता या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

वाघांपासून येथील जनतेचे संरक्षण करण्यासाठी ज्या यंत्रणा उभारण्याची गरज आहे, त्यासाठी निधी दिला जात नाही. सरकारने यासंबंधातील निर्णय वेगाने घेतले पाहिजे. सरकारी काम अन् चार महिने थांब, ही भूमिका आपल्याला न्याय देऊ शकणार नाही. कारण एक वाघ जर पिंजऱ्यात पकडायचा झाला, तर त्याची परवानगी घेण्याचा विषय मुंबईपर्यंत जातो. अशा निर्णयांमध्येसुद्धा शिथिलता देण्याची गरज आहे. आज सीसीएफ (मुख्य वनसंरक्षक) असणारा अधिकारी उद्याची पीसीसीएफ (प्रधान मुख्य संरक्षक) होतो. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजे. विशेष करून ज्या जिल्ह्यांमध्ये वाघ आणि मानव संघर्ष होतो, त्या जिल्ह्यासाठी तरी हा निर्णय स्थानिक स्तरावर अधिकाऱ्यांना देणे गरजेचे असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.