एसडीओंमुळे त्या विद्यार्थिनीचा अभियांत्रिकीचा प्रवेश सुकर
मुरुगानंथम एम यांची अशीही कर्तव्यतत्परता
चंद्रपूर : प्रशासकीय दप्तर दिरंगाईचा फटका नवा नाहीच. परंतु, कधी-कधी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे एखाद्याचे भविष्य सुकर होते. असाच अनुभव चंद्रपुरातील स्नेहलला आला. चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे स्नेहलचा अभियांत्रिकीमध्ये प्रवेश सुकर झाला. त्यामुळे तिची इंजिनिअर बनण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.
वडगाव प्रभागातील वडगाव या जुनी वस्ती परिसरातील स्नेहल भोयर ही एका अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना जिद्द व चिकाटीच्या भरोशावर तिने रामटेकच्या कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समध्ये इलेक्ट्रॉनिक शाखेत प्रवेश मिळवला.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या आत नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जमा करा, नाहीतर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रवेश रद्द होणार असे तिला महाविद्यालय प्रशासनाकडून कळविण्यात आले. शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे व खुल्या प्रवगार्तील शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नसल्यामुळे स्नेहलच्या पालकांसमोर मोठे संकट उभे राहिले. तिचे इंजिनियर होण्याचे स्वप्न अधुरे राहते का अशी भीती निर्माण झाली होती. त्यांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. देशमुख यांनी दुपारी 1.30 च्या दरम्यान चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी असतानांही त्यांनी देशमुख यांना व्हाट्सअप वर स्नेहलने केलेल्या अर्जाची पावती व इतर सर्व माहिती मागवून घेतली. दुपारचे २.३० वाजल्यामुळे स्नेहलच्या पालकांबरोबरच देशमुख यांची धाकधूक वाढली. मात्र दुपारी २.४० वाजता उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी देशमुख यांच्या व्हाट्सअप वर नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र पाठविले. अन त्या विद्यार्थिनीला ते प्रमाणपत्र पाठविण्याचा निरोप दिला. त्यांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे स्नेहलचा अभियांत्रिकीचा प्रवेश सुकर झाला.
सुमारे ५० प्रकरणांचा तातडीने निपटारा
विद्यार्थ्यांना नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्राची गरज असल्याचे उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांना कळताच त्यांनी स्नेहलबरोबरच इतर सुमारे ५० विद्यार्थ्यांच्या प्रकरणाचा आॅनलाइन पद्धतीन तातडीने निपटारा केला.
उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांना स्नेहलची समस्या सांगण्यासाठी मोबाईलवर कॉल केल्यानंतर त्यांनी व्यक्तिगत स्तरावर तातडीने दखल घेऊन अवघ्या एक तासात माझ्या व्हाट्सअप वर नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र पाठवले. प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांमुळेच लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कायम आहे. त्यांच्या कर्तव्यतत्परतेचा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना पुढेही असाच लाभ होईल अशी आशा आहे.
पप्पू देशमुख
संस्थापक अध्यक्ष, जनविकास सेना