अमरावती : येथे पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार कर्मचार्‍यांना वीजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बुधवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली. घटनेमुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. अक्षय साहेबराव सावरकर (वय 26 वर्ष, रा. टाकळी जहागिर), प्रशांत अरूणराव शेलोरकर (वय 31 वर्ष, रा. शिराळा), संजय बबनराव दंडनाईक (वय 45 वर्ष, रा. आदिवावसी कॉलनी), गोकुल शिलाकरम वाघ (वय 29 वर्ष, रा. टाकळी जहागिर), असे मृत्यू झालेल्यांची नावे आहे. हे चारही जण पोटे महाविद्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते.

महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे रंगरंगोटीचे काम सुरू होते. या कामासाठी लोखंडी पाईपची उंच शिडी आणण्यात आली होती. सध्या काम सुरू नसल्याने उपरोक्त चारही जणांना ती शिडी बाजुला करण्याचे व्यवस्थापनाने सांगितले होते. त्यानुसार बुधवारी शिडी बाजुला करण्याचे काम चारही जण करीत असताना शिडीच्या वरच्या भागाचा स्पर्श प्रवेशद्वारावरून जात असलेल्या 133 केव्ही विद्युत तारांना झाला. क्षणात शिडीत वीज प्रवाह संचारला आणि शिडीला पकडून असलेल्या चौघांचाही मृत्यू झाला.

घटना लक्षात येताच आरडाओरड सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचा ताफा महाविद्यालय परिसरात पोहोचला. अग्निशामक दलही महाविद्यालयात पोहोचले. विद्युत विभागाचे कर्मचारीही आले. त्यांनी ताराला स्पर्श झालेली शिडी बाजुला केली. चौघांचेही मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पोलिस पुढील चौकशी करीत आहे.