शेतात काम करणार्या महिलेवर वाघाचा हल्ला; महिला ठार
चंद्रपुर Tak
◾ चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात तीन दिवसात तिघे ठार
चंद्रपूर : शेतात काम करीत असलेल्या महिलेवर शेतशिवारात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून पन्नास मीटर पर्यंत ओढत नेत ठार केल्याची घटना आज शुक्रवारी (दि. 18 फेब्रुवारी 2022) सायंकाळी चार वाजताचे सुमारास मूल तालुक्यातील कोसंबी शेत शिवारात घडली. ज्ञानेश्वरवी वासुदेव मोहुरले (वय 55) असे मृत महिलेचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसात तिघा जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने जिल्हा वाघांच्या घटनांनी चांगलाच हादरला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्याच्या ठिकाणापासून चार किलोमीटर अंतरावरील मौजा कोसंबी येथील शेतकरी महिला ज्ञानेश्वरी वासुदेव मोहूर्ले ही रहिवासी होती. घरी शेती असल्याने ती घरच्या शेतावर काम करण्यासाठी दैनंदिन जात होती. सध्या शेतात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली असून ते काढण्याचे काम सुरू आहे. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वतः च्या शेतात आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही महिला लाखोरी खोदण्याकरीता गेली होती. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असताना ५५ वर्षीय महिलेवर मागून वाघाने अचानक हल्ला केला. मानेला पकडून पन्नास मिटर पर्यंत ओढत नेले. काही वेळातच महिला गतप्राण झाली.
सदर घटनेची माहिती कोसंबी वासीयांना कळताच सरपंच रवींद्र कामडी, पोलीस पाटील अर्चना मोहूर्ले, सारिका गेडाम व गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मूल पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. ठाणेदार सतिशसिंह राजपूत, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे मॅडम, क्षेत्र सहाय्यक प्रशांत खणके, वनरक्षक राकेश गुरनुले, वनरक्षक मरसकोल्हे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे पाठविण्यात आले. मूल वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे मॅडम यांनी मृतकांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणुन तीस हजार रुपये आर्थिक मदत दिली. पुढील तपास वनविभागाच्या वतीने प्रियंका वेलमे करीत आहेत तर पोलीस विभागाच्या वतीने ठाणेदार सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस करीत आहेत.
तिन दिवसात तिघांचा मृत्यू झाल्याने जिल्हा वाघांच्या घटनांनी हादरला आहे. बुधवारच्या रात्री भोजराज मेश्राम, गुरूवारच्या रात्री 16 वर्षाच्या राज भडके या मुलाचा आणि आज शुक्रवारी मूल तालुक्यातील कोलंबी गावातील ज्ञानेश्वरी मोहूर्ले महिला वाघांच्या बळी ठरल्या आहेत.
