पहिले वाघ, बिबट्यांचा बंदोबस्त करा तरच जाऊ कामावर
चंद्रपुर Tak
जीव धोक्यात आल्याने सिटीपीएसच्या कामगारांनी पुकारले कामबंद आंदोलन
चंद्रपूर : चौवीस तासात दोघांचा वाघाने बळी घेतल्या नंतर चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कामगारांनी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीकरीता आज शुक्रवार (दि. 18 फेब्रुवारी 22) सकाळपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
चंद्रपूर शहरालाच्या अगदी जवळ दुर्गापूर येथील महाऔष्णिक वीज केंद्र आहे. याचपरिसराला ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य आहे. लगतच वेकोलीचा एरिया आहे. औष्णिक वीज केंद्र व वेकोली परिसर जंगलव्याप्त असल्याने अनेक वर्षांपासून या भागात वन्यप्राण्यांचे वास्तव आहे. लगतच काही गावे लागून आहेत.
या गावातील काही नागरिकांचे वाघांने बळी घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार नागरिकांकडून वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे, मात्र वाघांचा बंदोबस्त झाला नाही. आता वाघ बिबट गावाशेजारी येऊन नागरिकांचे जीव घेत असल्याने महाऔष्णिक विज केंद्रातील कामगारांनी वाघांचा बंदोबस्त करा तरच कामावर येऊ असा पवित्रा घेत आज शुक्रवारी सकाळ पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
बुधवारी महाऔष्णिक विज केंद्रातून एका कामगाराला घरी परत येत असताना वाघाने ठार केले. त्यानंतर दुसर्या दिवशी गुरूवारी रात्री 16 वर्षाच्या मुलाला थेट घराजवळून उचलून नेत ठार केले आहे. काही दिवसांपूर्वी याच केंद्रातील एका कामगाराला जखमी केले आहे. या पार्श्वभूमीवर महाऔष्णिक विज केंद्रात कामावर येजा करताना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आज सकाळी कामगारांनी राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सूरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवून काम बंदचा निर्णय घेतला आहे. जो पर्यंत वाघ बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात येत नाही तो पर्यंत कामावर जाणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.
महाऔष्णिक विज केंद्राच्या परिसरात चार ते पाच वाघांचे वास्तव्य आढळून आले आहे. वाघाना जेरबंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांचे अन्यत्याग आंदोलन सुरूच असून जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत अन्यत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचे भटारकर यांनी सांगितले आहे. तर कामगारांनी ही जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत कामावर न जाण्याचा पवित्रा घेतला आहे. कामगारांच्या या निर्णयामुळे महाऔष्णिक विज केंद्राचे, वनविभाग व जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

